|| सेतू बांधा रे...||

Source :    Date :24-Apr-2020   
|
सकाळी डिजिटल स्वरूपात वृत्तपत्रे वाचत असताना केंद्र सरकारने १९८७ च्या साथीचे रोग प्रतिबंधक कायद्यात दुरुस्ती करण्यासाठी वटहुकूम काढण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याची बातमी मुख्यत्वेकरून वाचनात आली. सध्या देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. अशात हल्लेही वाढल्याने डाॅक्टर आणि आरोग्य कर्मचा-यांना काम करणे मुश्किल झाले आहे. तसेच कोरोनाबाधित रुग्ण राहात असलेल्या भागातील नागरिकांचे सर्वेक्षण महापालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचा-यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. अशा कार्यकर्त्यांवरही विनाकारण हल्ले चढवण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे डाॅक्टर, परिचारिका, इतर वैद्यकीय कर्मचारी, पोलीस, सफाई कामगार यांना निवासी संकुलातील सुविधा वापरण्यास निर्बंध आणून त्यांना त्रास देणा-या संकुलातील रहिवाशांविरोधात गुन्हा दाखल करण्याची भूमिका सरकारने घेतली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्यांना पत्र पाठवून आरोग्यसेवा कर्मचा-यांविरोधातील हल्लेखोरांवर कठोर कारवाईचा आदेश दिला आहे. कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करणारे डाॅक्टर, परिचारिका व अन्य कर्मचारी यांच्यावरील हल्ल्यांचा भारतीय वैद्यकीय संघटनेने निषेध केला असून बुधवारी रात्री लाक्षणिक आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु वेळेत सरकारने हस्तक्षेप केल्याने निषेध करण्याचा निर्णय मागे घेतला व जनतेची नामुष्की टळली.
 
अशा प्रकारच्या घटना- बातम्या वाचल्या की मन उद्विग्न होते. आणि माणूस किती असंस्कृतपणे वागू शकतो याची प्रचिती येते. आजच्या साथीच्या संकटकाळी जे संकटमोचक हनुमानाच्या भूमिकेत स्वतःच्या जिवाची बाजी लावून अहोरात्र जनतेची सेवा करत आहेत, वैद्यकीय गरजा भागवत आहेत, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याऐवजी जर त्यांच्यावर समाजातील काही घटक भ्याड हल्ले करणार असतील तर काय म्हणावे अशा विकृतीला? वास्तविक पाहता असा कायदा करून वटहुकूम जारी करण्याची सरकारवर वेळ येते, हेच मुळी दुर्दैवी आहे. या कोरोनाच्या संकटकाळात जनतेच्या सुखासाठी अहोरात्र झटणा-या कर्मचा-यांच्या मनात अशा वेळी कोणते विचार येत असतील? त्यांच्या अंतर्मनामध्ये किती द्वंद्व चालू असेल? कोणती प्रेरणा त्यांना सेवा देण्यास उद्युक्त करत असेल? त्यांच्या कुटुंबियांच्या- जीवाभावाच्या व्यक्तींच्या काळजीने हे कर्मचारी त्रस्त नसतील का? स्वतःला सुरक्षित ठेवून रुग्णांना बरे करण्याचे- रोगमुक्त करण्याचे किती अवघड शिवधनुष्य त्यांना उचलायचे आहे. परंतु अशा तणावाच्या वेळी कर्मचा-यांचे मनोबल वाढविण्याऐवजी जर जनता त्यांच्यावर भ्याड हल्ले करणार असेल, त्यांच्याबरोबर अश्लिल वर्तन करणार असेल, त्यांना शिवीगाळ करणार असेल तर का बरे कर्मचा-यांनी आपणांस सेवा पुरवायच्या?
 
विश्व आरोग्य संघटनेच्या मानकाप्रमाणे दर १००० रुग्णांमागे १ डॉक्टर असे प्रमाण असताना आपल्याकडे दर १०९२६ रुग्णांमागे १ डॉक्टर इतकी भयावह स्थिती आहे. अशा स्थितीत त्यांच्या अडचणी समजून घेऊन , त्यांच्याकडे विशेष लक्ष देऊन त्या अधिक तत्परतेने सोडवल्या पाहिजेत. तरच उद्याच्या भारताची आरोग्यव्यवस्था मजबूत ठेवण्याचे अग्निदिव्य पार पाडता येईल .
 
खरं तर रुग्ण बरा होण्यासाठी डॉक्टरांच्या कौशल्यापेक्षा महत्वाचा असतो तो डॉक्टर व रुग्ण यांच्यातील विश्वास! आणि म्हणूनच अशा संकटकाळी वैद्यकीय सेवा पुरवित असलेल्या कर्मचा-यांना जनतेने पाठिंबा देऊन, त्यांना अभिवादन करून आश्वस्त करण्याची गरज आहे. वेळोवेळी डाॅक्टरांनी जारी केलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करून त्यांना पूर्णपणे सहकार्य करण्याची गरज आहे. वैद्यकीय कर्मचारी व जनता यांचे अनोखा सेतू बांधून मनोमिलन होणे गरजेचे आहे. परस्पर पूरक वर्तनातून असा सहकार्याचा, पाठिंब्याचा, मदतीचा सेतू बांधला जाऊ शकतो. कर्मचा-यांच्या कुटुंबियांची- आप्तांची जनतेने काळजी घेऊन त्यांना तणावमुक्त ठेवण्याची जरूर आहे. जर का असे माणसा- माणसाच्या मनातले सेतू बांधले गेले तर संकटाचा अडथळ्याचा रस्ता सर्वांच्या मदतीने पार करणे, काही कठीण नाही.
 

bridge_1  H x W
 
 
चला तर मंडळी, सहवेदनेच्या भावनेने, संवेदनांच्या साहाय्याने मनामनातील अंतर सेतू बांधून जोडू या! पण आज सुरक्षितपणे घरात राहू या, गर्दी टाळू या! वैद्यकीय कर्मचा-यांना तणावमुक्त करू या!
 
...डाॅ. अनुजा पळसुलेदेसाई