शिक्षण पद्धतीत सनातन भारतीय परंपरा आणि तंत्रज्ञान यांची सांगड आवश्यक

14 Aug 2019 12:12:13
जानेवारी 12: विद्यार्थ्यांना अनुभूती मिळणारे शिक्षण असावे. अनेक प्रयोग व प्रसंग निर्माण करून किंवा प्रसंगाधारित शिक्षण पद्धती असावी. शिक्षण हा धंदा नसून ती एक देशसेवा आहे. यामुळे सनातन भारतीय परंपरा व सध्याचे तंत्रज्ञान यांची सांगड घालून देणारी शिक्षण पद्धती विकसित होणे आवश्यक असल्याचे मत प्रख्यात शिक्षण तज्ञ मिलिंद मराठे यांनी येथे बोलताना मांडले.
 

 
 
 
राष्ट्रीय शिक्षण संस्थेतर्फे स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त दरवर्षी होणाऱ्या स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेतील स्वामी विवेकानंदांच्या दृष्टीने समग्र विकासाचे शिक्षण : काय व कसे ? या विषयावर मिलिंद मराठे यांनी पुष्प गुंफले. नुकतेच स्वामी विवेकानंद विद्यामंदिराच्या प्रांगणात हे व्याख्यान पार पडले. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुभाष वाघमारे, कार्यवाह दीपक कुलकर्णी होते.
 
उपस्थितांना संबोधित करताना मिलिंद मराठे म्हणाले की, “शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा यांचा विकास म्हणजेच समग्र विकास आणि याला पूरक शिक्षण पद्धती म्हणजेच समग्र विकासाचे शिक्षण.” हेच विचार विवेकानंदांनी जगाला दिल्याचे व्याख्याते मिलिंद मराठे यांनी सांगितले. शिक्षण कसे असावे यावर बोलताना ते म्हणाले, “पालक, शिक्षक, विद्यार्थी व समविचारी संस्था यांनी एकत्र येऊन कार्य करणे आवश्यक आहे,” असे म्हटले. अभ्यासक्रमामध्ये पाच वर्षापर्यंतच्या मुलांसाठी खेळातून शिक्षण, पाच ते दहा वर्षापर्यंतच्या मुलांना व्यवहाराचे व इंद्रियांना वळण लावणारे शिक्षण, दहा ते वीस वर्षे वयोगटासाठी ज्ञान व चर्चा आधारित शिक्षण, तर वीस ते तीस वर्षांमधील विद्यार्थ्यांसाठी संशोधनात्मक शिक्षणावर भर दिला पाहिजे. याचबरोबर पालकांनादेखील सहा महिन्याचे प्रशिक्षण देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
 
“आपल्या देशाच्या केंद्रस्थानी धर्म असून या देशात धार्मिक शिक्षणाला विरोध करणाऱ्यांची हिमतीने तोंड दिले पाहिजे. सध्याच्या शिक्षण पद्धतीतील समग्रता संपण्यासाठी चार घटक कारणीभूत आहेत. यामध्ये निराशा आणि दुःख, जुलूम, अन्याय, आक्रमकता आणि भ्रष्टाचार हे घटक कारणीभूत आहेत. यावर विचार करून यापासून दूर करणारी आपली भारतीय शिक्षणपद्धती शिकवणे ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन मराठे यांनी केले.
12 जानेवारी 2019
Powered By Sangraha 9.0