स्वामी विवेकानंद विद्यामंदिर गणेशपथ शाळा :-
या शाळेच्या संबंधात सौ सुषमा भालचंद्र लिमये, मुख्याध्यापिका, स्वामी विवेकानंद विद्यामंदिर गणेशपथ, यांनी दिलेली माहिती अशी आहे-
गणेशपथ जवळ मिडल क्लास गव्हर्मेंट सर्व्हंट्स ची वस्ती होती. या भागात सौ कर्वे आणि सौ. सरवटे या दोन्ही शिशुविहार नावाची, शाळा सौ कर्वे यांच्या घरात चालवीत होत्या. दिनांक 1 मे 1968 रोजी राष्ट्रीय शिक्षण संस्थेची स्थापना झाल्यावर थोड्याच कालावधीत शिशुविहार ही शाळा संस्थेकडे संचालन करण्यासाठी सुपूर्द करण्यात आली. त्यावेळी रुपये पस्तीस या मानधनावर त्यांनी व इतर शिक्षकांनी नोकरी "सेवाभाव" म्हणूनच केली. स्वतः चालत जाऊन पालकांशी संपर्क साधून, विद्यार्थिसंख्या वाढवण्याकरता सर्व शिक्षकांनी केलेल्या प्रयत्नांमुळे 4 जानेवारी 1969 मध्ये विद्यार्थीसंख्या जी 15 होती ती मार्च 1971 मध्ये त्यात वाढ होऊन 225 झाली.
शाळेची होत असेलली वाढ पाहून गव्हर्मेंट हाउसिंग सोसायटीने 99 वर्षांच्या लिजने संस्थेस एक प्लॉट दिला. त्या जागेवर चार खोल्यांचा प्लॅन तयार झाला. दिनांक 12 डिसेंबर 1970 रोजी संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर वा. मु. बक्षी यांच्या हस्ते येथे भूमिपूजन झाले. श्री मनोहर पांडुरंग सडेकर हे त्या वेळी संस्थेचे उपकार्यवाह होते. त्यांनी शाळेत करता बहुमूल्य वेळ खर्च केला. 1972 साली श्री. सडेकरांनी सात ते बारा वयोगटातील 200 विद्यार्थ्यांची सहल किल्ले रायगडावर नेली होती. या गोष्टीला ऐतिहासिक महत्त्व आहे.
संस्थेच्या जिद्दी, प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्नांतून नेहरू मैदानाजवळील "स्वामी विवेकानंद विद्यामंदिर" गोपाळनगर, "विक्रमादित्य भवन" ही वास्तू सन 1983 मध्ये 30 लाख रुपये खर्च करून उभी राहिली. शाळेला शासकीय मान्यता सन 1972 मध्ये व शाळेस अनुदान 1983 पासून प्राप्त झाले.