**पालकांसाठी प्रबोधनपर व्याख्यान
शनिवार दिनांक 12 फेब्रुवारी 2022, रोजी स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर, प्राथमिक शाळेत सकाळी 9 .30 वाजता दत्तनगर प्रांगणात पालकांसाठी प्रबोधनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले. व्याख्यानासाठी आमंत्रित सन्माननीय व्याख्याते श्री. दिनेश गजानन-रत्ना शेटे हे मानसोपचार तज्ञ असून समुपदेशक म्हणून भारत भर अनेक संस्था मध्ये कार्यरत आहेत. त्याच प्रमाणे सन्मा. व्याख्याते हे दत्तनगर शाळेचे माजी विद्यार्थी आहेत ही अभिमानाची बाब आहे. 'शिक्षण 'हे एकमेव उन्नतीचे साधन आहे परंतु कोरोनाच्या संकटामुळे शिक्षण क्षेत्रात अस्वस्थता निर्माण झाली . ही शैक्षणिक दरी पार करताना 'पालक' म्हणून माझी काय जबाबदारी आहे याबाबत पालकांचे प्रबोधन व्हावे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून हे व्याख्यान आयोजित करण्यात आले .
कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी माननीय श्री. दिनेश शेटे यांनी विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधून त्यांच्या समस्या आणि प्रश्न जाणून घेतले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. कार्यक्रमास शाळा समिती अध्यक्षा मा. डॉ. सौ. सरोज कुलकर्णी मॅडम शाळेच्या मुख्याध्यापिका मा. सौ. मुणगेकर मॅडम उपस्थित होत्या. इयत्ता चौथी ते सातवी चा पालक वर्ग आणि सहावी-सातवी चे विद्यार्थी हे देखील प्रांगणात उपस्थित होते. मुख्याध्यापिका मा.सौ.मुणगेकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले . श्री पवार सर यांनी व्याख्याते यांचा विस्तृत परिचय करून दिला. मान्यवरांचे भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर व्याख्यानाचा कार्यक्रम झाला.
श्री शेटे सर यांनी पालकांनाही काही प्रश्नावली पत्रक दिले होते. पालकांच्या प्रतिसादावरून त्यांनी व्याख्यानाला सुरुवात केली. लॉकडाऊनचा काळ हा वाया गेलेला वेळ नसून एक सुसंधी म्हणून जर पाहिले असते तर विद्यार्थ्यांच्या अनेक कलागुणांना वाव देता आला असता हा मुद्दा त्यांनी पालकांसमोर उपस्थित केला. त्याचप्रमाणे एक पालक म्हणून आपण विद्यार्थ्यांना किती जाणतो ,त्यांना किती वेळ देतो आणि तो का आवश्यक आहे , याचेही महत्त्व त्यांनी छोट्या-छोट्या उदाहरणातून पटवून दिले .पाठ्यपुस्तकातील अभ्यास म्हणजे केवळ शिक्षण नसून शाळेतील विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांचा सहभाग अनुभवातून शिक्षण आणि कौशल्यांचा विकास म्हणजे खरे शिक्षण, ज्याने ती व्यक्ती समृद्ध तर होतेच परंतु समाजालाही ती समृद्ध करते, हा विचार पालकांसमोर मांडला. नकारात्मक वातावरणातून सकारात्मकतेकडे जाणारा विचार प्रवाह पालकांना देण्याचा प्रयत्न केला. स्वतःच्या दत्तनगर शाळेतील विविध अनुभव आणि त्याचा पुढील आयुष्यात करिअरसाठी कशा प्रकारे उपयोग झाला हे सांगून विद्यार्थी आणि पालकांशी सुसंवाद साधला .जागृत पालक संघ आणि शाळा यामुळे विद्यार्थ्यांचा विकास साधता येतो, हा विचार मांडून सर्व पालकांना प्रोत्साहित केले. व्याख्यानाच्या निमित्ताने एका आदर्श व्यक्तिमत्वाची भेट विद्यार्थ्यांना घडून आली ,नवीन विचारांची जोड मिळाली. त्यानंतर शाळा समिती अध्यक्षा मा. डॉ. सरोज कुलकर्णी मॅडम यांनी ही पालकांशी संवाद साधला. मान्यवरांचे आभार मानून शांतीपाठाने कार्यक्रमाची सांगता झाली.