दिनांक 3 जानेवारी ते 12 जानेवारी 2022 जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा अभियान पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त आमच्या शाळेत दिनांक 3 ते 12 जानेवारी 2022 यादरम्यान ‘जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्रातील लेकींचा ‘अभियान राबविण्यात आले. या अभियानाअंतर्गत विद्यार्थी व शिक्षकांसाठी विविध शैक्षणिक कार्यक्रम राबविण्यात आले. या अभियानादरम्यान कोरोना रोगासंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वांचे, नियमांचे पालन करण्यात आले.
ज्ञानालाच आहे मान, ज्ञानाचाच होईल सन्मान,
त्यासाठी तुम्ही शिका ,सावित्रीच्या लेकी ऐका,
तुम्ही सावित्रीच्या हाका ।
असंख्य अडचणींवर मात करून स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती सोमवार दिनांक 3 जानेवारी 2022 रोजी साजरी करण्यात आली.. तसेच 3 जानेवारी बालिका दिन म्हणूनही साजरा करण्यात आला. यादिवशी क्रांतिज्योती सावित्रीबाईंच्या प्रतिमेला पुष्पहार घालून शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ. कांबळे बाई यांनी दीपप्रज्वलन केले.शाळेच्या मुख्या. माननीय सौ.मुणगेकर बाई यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थिनींनी सावित्रीबाई यांची वेशभूषा करून त्यांच्याबद्दल माहिती सांगितली. तसेच शाळेतील सहशिक्षिका सौ. सुजाता औटी यांनीही सावित्रीबाईंच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. यावेळी शाळेचे सर्व शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
बुधवार दिनांक 5 जानेवारी 2022 या दिवशी ‘यशस्वी महिलांच्या यशोगाथा/ मुलाखती’ या उपक्रमांतर्गत स्थानिक भागातील कर्तुत्ववान महिला माननीय डॉ. सौ. पूर्णिमा ढाके( एम. बी .बी. एस) यांची इयत्ता सहावी, सातवीच्या विद्यार्थिनींनी मुलाखत घेतली. तसेच 'कोव्हीड योद्धा' म्हणून त्यांचा सत्कारही करण्यात आला.सकाळी दहा वाजता शाळेच्या सभागृहात माननीय डॉ. सौ. पूर्णिमा ढाके यांचा सत्कार शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय सौ. मुणगेकर बाई यांनी भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन केला. कोविड 19 या आजाराविषयी विद्यार्थ्यांनी त्यांना अनेक प्रश्न विचारून त्यांची मुलाखत घेतली. त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे सोप्या शब्दात देऊन त्यांच्या शंकांचे निरसन केले .त्याचबरोबर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम ऑफलाइन, ऑनलाईन असल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना मुलाखत पाहता आली. शालेय समिती अध्यक्षा माननीय डॉ. सौ.सरोज कुलकर्णी व सदस्या माननीय सौ. मीरा कुलकर्णी, माननीय अँड. ललिता जोशी उपस्थित होत्या. त्यांनी या कार्यक्रमाचे व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
शुक्रवार दि. 7 जानेवारी 2022 रोजी सकाळी 9 वाजता ‘महिलांची मासिक पाळी’ या विषयावर इयत्ता सहावी ,सातवीच्या विद्यार्थिनी व मातापालकांसाठी उद्बोधन पर व्याख्यान घेण्यात आले. या कार्यक्रमासाठी डॉ.रेवती आढाव (एम. बी .बी .एस. एम. डी.) स्त्री रोगतज्ज्ञ व प्रसुती तज्ज्ञ व्याख्याता म्हणून लाभल्या. शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय सौ . मुणगेकर मॅडम यांनी प्रमुख पाहुण्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले . या कार्यक्रमासाठी शालेय समिती अध्यक्षा माननीय डॉ. सौ .सरोज कुलकर्णी, शालेय समिती सदस्या मा. सौ. मीरा कुलकर्णी ,माननीय सौ. ललिता जोशी उपस्थित होत्या. पाळी येण्याचे वय ,पाळी येताना स्त्री शरीरात होणारे बदल, मानसिक बदल, पाळी आल्यानंतर घ्यायची काळजी, पाळी विषयी असलेले समज-गैरसमज, सामाजिक दृष्टिकोन मुलींचा आहार आणि व्यायाम या विषयी बहुमोल मार्गदर्शन केले. मातापालक व विद्यार्थ्यांनी विचारलेल्या शंकांचे व प्रश्नांची उत्तरे दिली. सदर कार्यक्रम ऑफलाइन आयोजित केला असल्याने कार्यक्रमासाठी 47 विद्यार्थिनी व 35 मातापालक उपस्थित होत्या .
शनिवार दिनांक 8 जानेवारी 2022 रोजी कार्यानुभव विषयांतर्गत इयत्ता तिसरी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तु पासून टिकाऊ वस्तू तयार केल्या. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनाशक्तीचा वापर करून विविध प्रकारच्या वस्तू स्वतः बनवल्या होत्या. प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या वस्तूचा फोटो काढून आपल्या वर्गशिक्षकांना व्हाट्सअप द्वारे पाठवले .या फोटोंचे संकलन श्री मयूर राऊत यांनी केले.
प्रत्येक व्यक्तीची काही ना काही महत्वाकांक्षा किंवा इच्छा असते. विद्यार्थ्यांना लहान असताना बऱ्याच गोष्टी पाहून आनंद होतो. मग मोठे झाल्यावर आपण कोण व्हायचे याची लहानपणीच स्वप्न पाहिली जातात.’माझी उंची माझे स्वप्न ‘या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांनी आपले स्वप्न चित्ररूपाने कागदावर मांडले.. सोमवार दिनांक 10 जानेवारी 2020 रोजी इयत्ता पहिली ते चौथीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी’ माझी उंची माझे स्वप्न’ या विषयावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत इयत्ता पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आपले स्वप्न चित्ररूपाने कागदावर मांडले होते. ही स्पर्धा ऑनलाईन घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी चित्रांचे फोटो काढून व्हाट्सअप द्वारे वर्गशिक्षकांना पाठवले. शिक्षकांनी या फोटोमधून प्रथम दोन क्रमांक काढले .या फोटोचे संकलन श्री राऊत सर यांनी केले.
स्वराज्याचा जीने घडविला विधाता,
धन्य ती स्वराज्य जननी जिजामाता !
बुधवार दिनांक 12 जानेवारी 2022 रोजी राजमाता जिजाऊ यांची जयंती आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन माननीय मुख्याध्यापिका सौ. मुणगेकर बाई यांनी केले. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन ठेवण्यात आला होता. राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त विद्यार्थ्यांनी वेशभूषा करून ऑनलाईन एकपात्री अभिनय व गीताचे सादरीकरण केले.
स्वामी विवेकानंद यांच्या विचारांची प्रेरणा देणारे, विवेकानंद केंद्र यांचा प्रचार व प्रसार यांचे कार्य करणारे श्री . एकनाथजी रानडे यांची व्हिडिओ क्लिप दाखवून विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर स्वामी विवेकानंद यांच्या जीवन चरित्रावर आधारित प्रश्नमंजूषा स्पर्धा घेण्यात आली. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना विवेकानंद यांच्या जीवन तत्वांचा संदेश विद्यार्थ्यांना देता आला. सदर कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. गीतांजली मुणगेकर ,शाळा समिती अध्यक्षा डॉ. सौ.सरोज कुलकर्णी , शाळा समिती सदस्या मा. सौ.माधवी कुलकर्णी ,मा. सौ.दीपा आपटे ,मा. सौ. ललिता जोशी मा.सौ मीरा कुलकर्णी या उपस्थित होत्या. तसेच संस्थेचे पदाधिकारी मा. श्री शास्त्री सर उपस्थित होते .या कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली. संपूर्ण कार्यक्रमाचा अहवाललेखन सहशिक्षिका सौ. खाडे यांनी केले व चित्रफीत, छायाचित्रांचे संकलन श्री. राऊत यांनी केले.
अशा प्रकारे वेगवेगळे उपक्रम घेऊन शाळेने 'जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले 'यांच्या कर्तुत्वाचा व व्यक्तिमत्त्वाचा आदर्श आपल्या विद्यार्थ्यांसमोर मांडला.