स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर (प्राथ.)
मातृदिन
* सोमवार दि.०६/०९/२०२१*
''प्रसादपट झाकिती परी परा गुरूचे थिटे,
म्हणूनि म्हणती भले,न ऋण जन्मदेचे फिटे."
आईबाबतची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 'श्रावण अमावस्या' म्हणजेच 'पिठोरी अमावस्या' हा दिवस आपण मातृदिन म्हणून साजरा करतो. आपल्या आईबद्दल आदर, प्रेम व कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. भारतीय संस्कृतीमध्ये मातेचे स्थान अतिशय उच्च असल्याचे सांगण्यात आलेले आहे. माता ही आपली सर्वात श्रेष्ठ गुरू मानली गेली आहे.
मातृदिनाच्या दिवशी मुले आईच्या पाया पडून आशीर्वाद घेतात.ही खरी आपली भारतीय परंपरा.ऋग्वेदामध्ये अनेक ठिकाणी मातेची महती वर्णन केलेली आहे. तिला सर्वांहून अधिक घनिष्ठ आणि प्रिय मानले गेले आहे. अथर्व वेदामध्ये 'मात्रा भवतु सन्माना' अर्थात मुलांनी मातेला अनुकूल असा मनोभाव धारण करून रहावे, असे सांगण्यात आले आहे.
गुरु वशिष्ठ मातेचे श्रेष्ठत्व वर्णन करताना म्हणतात,
नास्ति मातृसमाछाया नास्ति मातृसमागती ।
नास्ति मातृसमं त्राणं नास्ति मातृसमा प्रिया।
( मातेसारखी छाया नाही. मातेसारखे आश्रयस्थान नाही. मातेसारखे रक्षण नाही आणि मातेइतके प्रिय कोणीही नाही.)
पाश्चात्य संस्कृती प्रमाणे 'मदर्स डे' साजरा करण्यापेक्षा भारतीय संस्कृतीप्रमाणे पिठोरी अमावस्येला 'मातृदिन' साजरा करून आईचे आशीर्वाद घेण्याचे संस्कार नवीन पिढीवर होणे अत्यावश्यक आहे.याच अनुषंगाने सोमवार दिनांक ६ सप्टेंबर २०२१ रोजी स्वामी विवेकानंद,दत्तनगर (प्राथमिक) शाळेत आभासी प्रणालीद्वारे'मातृदिन' साजरा करण्यात आला.
मातृदिनाच्या दिवशी प्रत्येक ऑनलाईन वर्गांत विद्यार्थ्यांना मातृदिनाचे महत्त्व सांगण्यात आले. तसेच मातृदिन साजरा करण्यामागील हेतू समजावून सांगण्यात आला.मातृदिनाचे औचित्य साधून मा.मुख्याध्यापिका सौ.मुणगेकर बाई यांच्या मार्गदर्शनानुसार खालील स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
🌻 इ.१ली ते ४ थी🌻 :-
• आईचे औक्षण करणे आणि आईला स्वनिर्मित भेटकार्ड देणे.,
🌻 इ.५वी ते ७ वी🌻 :-
•आईचे औक्षण करणे आणि आईला स्वनिर्मित भेटकार्ड देणे.
•आईविषयी स्वरचित कवितालेखन करणे. •काव्यवाचन करणे.
हे उपक्रम ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आले. विद्यार्थ्यांनी कलात्मक पद्धतीने अत्यंत सुंदर भेटकार्डे तयार केली.विद्यार्थ्यांनी आपापल्या घरीच आईचे औक्षण केले.आईचे औक्षण करताना आणि आईला भेटकार्ड देताना काढलेली छायाचित्रे विद्यार्थ्यांनी आपल्या वर्गशिक्षिकांना व्हाॅट्स ॲपद्वारे पाठविली. काही विद्यार्थ्यांनी मातृदिनाचे निमित्त साधून 'आई' या विषयावर कविता लेखन केले.काही विद्यार्थ्यांनी काव्यवाचनही केले.तसेच काहींनी स्वरचित कवितांची छायाचित्रे शिक्षकांना पाठविली.काव्यवाचनाच्या ध्वनीचित्रफितीही विद्यार्थ्यांनी शिक्षकांना ऑनलाईन पद्धतीने पाठविल्या. विद्यार्थ्यांकडून वर्गनिहाय प्राप्त झालेली छायाचित्रे आणि ध्वनीचित्रफितींचे संकलन व मनोवेधक एकत्रिकरण करून ते आंतरजालावरील संस्थेच्या संकेतस्थळावर पाठविण्याचे कार्य शाळेचे स.शिक्षक श्री.मयूर राऊत सर यांनी केले.मातृदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सदर उपक्रमाचे अहवाल लेखनस.शिक्षिका सौ.सुजाता औटी यांनी केले.माननीय मुख्याध्यापिकांचे उत्कृष्ट पूर्वनियोजन, शिक्षकांचे मार्गदर्शन,पालकांचे सहकार्य आणि विद्यार्थ्यांचे अपार श्रम यांमुळे हा उपक्रम यशस्वी झाला.अशाप्रकारे, आई विषयी आपला आदर व प्रेम व्यक्त करण्याचा हा दिवस अर्थात 'मातृदिन' शाळेत मोठ्या उत्साहात साजरा झाला.