''श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव'' राष्ट्रीय शिक्षण संस्था,स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर प्राथमिक.डोंबिवली पूर्व.
03 Sep 2021 13:30:14
राष्ट्रीय शिक्षण संस्था,
स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर प्राथमिक.
* श्रीकृष्ण जन्माष्टमी
दिनांक 30 ऑगस्ट 2021
यदा यदाही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत,
अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् |
या श्रीमद्भगवद्गीतेच्या श्लोका प्रमाणे संपूर्ण जगातून अधर्माचा नाश करणारे आणि धर्मसंस्थापनेसाठी जन्म घेणारे श्री विष्णूंचा आठवा अवतार म्हणजेच भगवान श्रीकृष्ण होय. प्रामाणिकपणे कर्तव्य करून कर्म फलत्याग करण्याचा संदेश देणारे, जीवनदर्शन घडवणारे - भगवान श्रीकृष्ण यांचा जन्मदिवस म्हणजे श्रावण कृष्ण अष्टमी. हिंदू धार्मिक परंपरेनुसार श्री कृष्ण जन्माष्टमी या दिवशी रात्री कृष्णाची पूजा करून आरती करतात, रात्रभर जागरण करतात. दुसऱ्या दिवशी जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात, यालाच आपण गोपाळकाला असे म्हणतो. देशभर दहीहंडी चे कार्यक्रम केले जातात. सध्या कोरोनाच्या काळात जल्लोषात हा कार्यक्रम जरी करता नाही आला तरी श्रीकृष्णाची व्यक्तिरेखा, त्यांचे शाश्वत तत्वज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे, आपली परंपरा जपावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून श्रीकृष्ण जन्माष्टमी चे औचित्य साधून उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.शाळेच्या मा.मुख्याध्यापिका सौ.गीतांजली मुणगेकर यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून इयत्ता निहाय पुढील उपक्रमांचे आयोजन केले.
* इयत्ता पहिली व दुसरी:
दहीहंडी चे चित्र रंगवणे
* इयत्ता तिसरी व चौथी:
श्री बालकृष्णाच्या चित्रास डाळी- बियांचे कोलाज काम.
* इयत्ता पाचवी ते सातवी: श्रीकृष्णाचे चित्र कोलाज काम.
वरील नियोजित उपक्रम अनुसार सर्व शिक्षकांनी व्हाट्सअप वर विद्यार्थ्यांना श्रीकृष्णाचे चित्र पाठवले. रंगभरण तसेच कोलाजकाम याविषयी मार्गदर्शन केले. सर्व विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला.तसेच उत्साही विद्यार्थ्यांनी राधा कृष्णाची वेशभूषा करूनही गोपाळकाला या उत्सवात सहभाग घेतला. ऑनलाइन क्लास मधूनही सर्व शिक्षकांनी श्रीकृष्णाचा श्लोक विद्यार्थ्यांकडून मुखोद्गत करून घेतला. निवडक विद्यार्थ्यांनी श्रीमद्भगवद्गीतेचे श्लोकही म्हणून दाखवले. श्रीकृष्ण ज्याप्रमाणे आपल्या सर्व जाती-धर्माच्या सवंगड्यांसोबत एकजुटीने थरावर थर रचून हंडीतील वरचे लोणी काढून आपल्या मित्रांसोबत वाटून खात असे, त्याचप्रमाणे भेदभाव न करता सर्वांमध्ये मिळून-मिसळून एकजुटीने कार्य करण्याचा संदेश गोपाळकाला या सणातून विद्यार्थ्यांना देण्यात आला.
या कोरोनाच्या संकटातून मुक्त होऊन श्रीकृष्णाप्रमाणे स्वच्छंदी होऊन सर्व बालगोपाळांना बागडता यावे, हीच सदिच्छा सर्वांनी व्यक्त केली.शाळा समितीच्या सन्माननीय अध्यक्षा आणि सदस्य यांनीदेखील विद्यार्थ्यांचे कौतुक केले. मुख्याध्यापिका , शिक्षक, पालक यांच्या प्रोत्साहनामुळे, विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे उपक्रम आनंदमय झाला. सदर उपक्रमाचे फोटो संकलन व अहवाल लेखन सौ.नयना पाटील यांनी केले. व्हिडीओ तयार करण्याचे काम श्री मयूर राऊत यांनी केले.