राष्ट्रीय शिक्षण संस्था ,स्वामी विवेकानंद विद्यामंदिर,दत्तनगर प्राथमिक डोंबिवली पूर्व शाळेत आभासी प्रणालीद्वारे रविवार दिनांक ०१ ऑगस्ट २०२१ रोजी लोकमान्य टिळक पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली .
'लेखणीचे धनुष्य हाती
शब्दांचे बाण भाती
करिता नमन शब्दास्त्रे
शब्द होती ब्रह्मास्त्रे'
अशा नरा एक ऑगस्ट दिनी आदरांजली.स्वराज्याच्या घोषणेला स्मरून अर्पण श्रद्धांजली.
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील प्रखर राष्ट्रवादी नेते,एक आदर्श शिक्षक,समाजसुधारक,देशप्रेमी स्वातंत्र्य सेनानी,वृत्तपत्रे व सार्वजनिक उत्सवातून राष्ट्रीय विचार व भावना यांचे बीजारोपण करणारे निर्भीड पत्रकार,तेजस्वी व्यक्तिमत्व असलेले महापुरुष म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक.एक ऑगस्ट ही त्यांची पुण्यतिथी.त्यांच्या पुण्यतिथी दिनाचे औचित्य साधून त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी ऑनलाइन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.टिळकांचे पुण्यस्मरण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.माननीय मुख्याध्यापिका सौ.गीतांजली मुणगेकर यांनी उपस्थित शाळा समितीचे आजी-माजी अध्यक्ष व सदस्य यांचे शब्द सुमनांनी स्वागत केले.त्यानंतर इयत्ता तिसरीची विद्यार्थिनी श्रेया भालेराव हिने गीत गायनातून तर इयत्ता सातवीची विद्यार्थिनी जुई कायसुकर हिने पोवाड्यातून टिळकांना आदरांजली वाहिली.पुण्यस्मरण दिनाच्या निमित्ताने इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन उपक्रमांचे आयोजन केले होते.विद्यार्थ्यांनी उपक्रमात उत्साहाने सहभाग घेतला.टिळकांच्या जीवन कार्याविषयी माहिती देणारे मराठी,हिंदी,इंग्रजी या तीन भाषांमधील उतारे पाठांतरासाठी व वक्तृत्व स्पर्धेसाठी देण्यात आले होते. इ.१ली ते ४थी-उतारा पाठांतर(मराठी)
इ.५वी-वक्तृत्व स्पर्धा(मराठी)
इ.६वी -वक्तृत्व स्पर्धा(हिंदी)
इ.७वी-वक्तृत्व स्पर्धा(इंग्रजी)
इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी उतारा पाठांतराचे व इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी वक्तृत्व स्पर्धेचे व्हिडिओ आपापल्या वर्गशिक्षकांना पाठवले.त्यातून उत्कृष्ट पाठांतराचे व वक्तृत्व स्पर्धेचे व्हिडिओ पाठवणाऱ्या विद्यार्थ्यांची तुकडीनुसार निवड करण्यात आली.इयत्ता तिसरी ते सातवीच्या निवडक विद्यार्थ्यांनी मराठी,हिंदी,इंग्रजी मधून उताऱ्यांचे ऑनलाइन सादरीकरण केले.आभासी प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांना लोकमान्य टिळकांच्या जीवन कार्यावर आधारित चित्रफित दाखवण्यात आली.याचे संपूर्ण नियोजन श्री.एकनाथ पवार सर यांनी केले.त्यानंतर इयत्ता सातवीतील विद्यार्थिनी देवश्री महाडिक हिने टिळक गौरव गीत गायिले.सौ.सुजाता औटी बाई यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार मानण्याचे काम केले.कार्यक्रमाचा शेवट पसायदानाने झाला.सदर उपक्रमाचे एकत्रित व्हिडिओ तयार करणे व त्यांची लिंक तयार करून ते प्रक्षेपित करण्याचे काम श्री.मयूर राऊत सर यांनी उत्कृष्टपणे केले.शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय सौ.गीतांजली मुणगेकर मॅडम यांचे नेतृत्व,शिक्षकांचे उत्तम नियोजन,पालक व विद्यार्थी यांची मेहनत व उत्साह यामधूनच सदर उपक्रम साकारला गेला.
शालेय समितीच्या सन्माननीय आजी- माजी अध्यक्षांनी तसेच शालेय समितीचे सर्व सन्माननीय सदस्य यांनी उपक्रमाचे कौतुक करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.