* संविधान दिन *
आज स्वातंत्र्यात जगतो आम्ही,बाबासाहेबांना स्मरतो आम्ही.
शाहू,फुले यांच्या विचारांना,ओंजळीत या धरतो आम्ही.
जरी वेगळ्या भाषा असल्यातरी एकता कायम आहे.
कारण तुम्ही दिलेल्या संविधानात,समानतेचा नियम आहे.
हा सलोखा,ही बंधुता,राष्ट्रभावना वाढत जाईल.
रोज पहाटे सूर्य दिसला की,तुमची आठवण येत राहील.
भारताचे संविधान हा भारताचा सर्वोच्च व पायाभूत कायदा आहे.भारतीय संविधानावर विविध पाश्चात्य संविधानांचा प्रभाव आहे.२९ऑगस्ट १९४७ रोजी भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीची स्थापना करण्यात आली. या समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची नियुक्ती करण्यात आली. डॉक्टर आंबेडकर यांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी म्हणजेच २ वर्ष ११ महिने १८ दिवसात संविधान तयार करून राष्ट्राला समर्पित केले.हे संविधान जगातील सर्वात मोठे संविधान म्हणून गणले जाते .
भारतीय राज्यघटनेतील मूलभूत तत्त्वांची व्याप्ती आणि सर्वसमावेशकता विद्यार्थ्यांना समजणे, त्यांच्या मनावर ती मुलतत्वे कोरली जाणे तसेच संविधानाचा परिपूर्ण परिचय सर्व विद्यार्थ्यांना होणे आवश्यक आहे म्हणूनच भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने संविधानविषयी जाणीव जागृती निर्माण व्हावी,विद्यार्थ्यांनी सुजाण व सुसंस्कृत नागरिक बनावे,विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात संविधानाचा अंगीकार करावा यासाठी शासनाने दिनांक २३ नोव्हेंबर २०२१ ते २६ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत "माझे संविधान,माझा अभिमान" हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला.त्याअंतर्गत स्वामी विवेकानंद विद्यामंदिर,दत्तनगर (प्राथ.)शाळेच्या सन्माननीय मुख्याध्यापिका सौ.गीतांजली मुणगेकर मॅडम यांनी सर्व वर्गशिक्षकांच्या मदतीने विविध उपक्रमांचे आयोजन केले.
शुक्रवार दिनांक २६ नोव्हेंबर २०२१ रोजी सन्माननीय मुख्याध्यापिका सौ.मुणगेकर मॅडम यांनी आपल्या सर्व सहाय्यक शिक्षकांच्या उपस्थित डॉ.बाबासाहेब आंबेडकर व डॉ.राजेंद्र प्रसाद यांच्या प्रतिमेचे पूजन केले.तसेच दिपप्रज्वलन करून संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले.संविधान दिनाचे औचित्य साधून इयत्ता तिसरी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी पुढील स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
* इयत्ता तिसरी ते पाचवी
विषय- भारतीय संविधान
स्पर्धांची नावे-१)वक्तृत्व स्पर्धा
२)रांगोळी स्पर्धा
३)चित्रकला स्पर्धा
* इयत्ता सहावी व सातवी-
विषय -१)संविधान निर्मितीचा प्रवास
२)भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार
३)भारतीय संविधान आणि लोकशाही
स्पर्धांची नावे -१)निबंध लेखन
२)प्रश्नमंजुषा स्पर्धा
३)घोषवाक्य लेखन
४)वक्तृत्व स्पर्धा
५)पोस्टर निर्मिती
उपरोक्त स्पर्धांमध्ये बहुसंख्य विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला.विद्यार्थ्यांनी निबंध,रांगोळी,चित्रकला,पोस्टर निर्मिती,घोषवाक्य लेखन अशा स्पर्धांचे विविध फोटो तसेच वक्तृत्व स्पर्धांसाठी चे व्हिडीओ क्लिप्स आपापल्या वर्गशिक्षकांना व्हाॅट्सॲपद्वारे पाठवले.सर्व वर्ग शिक्षकांनी विचार विनिमय करून या स्पर्धांचे निकाल जाहीर केले. इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धा शाळेचे सहाय्यक शिक्षक श्री.पवार सर यांनी श्री.नाठे सर व सौ.नयना पाटील मॅडम यांच्या सहकार्याने यशस्वीरित्या पार पाडली.
या संपूर्ण कार्यक्रमासाठी शाळेच्या सन्माननीय मुख्याध्यापिका सौ.गीतांजली मुणगेकर मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.या कार्यक्रमाचे अहवाल लेखन,छायाचित्र व चित्रफिती यांचे संकलन शाळेच्या सहाय्यक शिक्षिका सौ.श्रुती नाईक मॅडम यांनी केले व सहाय्यक शिक्षक श्री. मयूर राऊत सर यांनी प्रस्तुत कार्यक्रमाची सुंदर चित्रफित निर्मिती केली.