स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर प्राथमिक डोंबिवली पूर्व शाळेत ३ जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती ऑनलाईन पद्धतीने उत्साहात साजरी...
11 Jan 2021 18:08:14
''क्रांतीज्योती,सावित्रीबाई फुले''
“ शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार,
तीच सावित्री आज जगाची शिलेदार”
'क्रांतीज्योती सावित्रीबाई ' यांना त्यांच्या 3 जानेवारी रोजी साजरा होत असलेल्या जयंती निमित्त त्रिवार वंदन.........
“तु क्रांतीज्योती,तू धैर्याची मूर्ती
तु ज्ञानाई , तुझ्या ऋणातून कशी
होऊ मी उतराई!!
मिळाला हक्क शिक्षणाचा तुझ्या कष्टामुळे
आद्य आणि वंद्य तू आमची
लाडकी सावित्रीबाई!"
राष्ट्रीय शिक्षण संस्था संचालित, स्वामी विवेकानंद विद्यामंदिर,दत्तनगर(प्राथमिक)डोंबिवली,पूर्व.याशाळेने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले' यांच्या जयंतीनिमित्त इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन उपक्रमांचे आयोजन केले होते. आज स्त्री प्रत्येक क्षेत्रात छोट्या पदापासून ते उच्च पदापर्यंत कार्यरत आहे. शिक्षणाने व आधुनिक विचाराने तिने आपले भविष्याचे शिखर गाठले आहे.
"घडलो नसतो मी जर
शिकली नसती माझी माय
जर नसत्या सावित्रीबाई तर .....
कशी शिकली असती माझी माय"
भारतीय स्त्रियांच्या मनात ज्ञानाची ज्योत पेटवणारी भारतातील पहिली महिला शिक्षिका म्हणजे'क्रांतिज्योती,समाज सुधारक सावित्रीबाई फुले'होय. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्याकाळी आपल्या समाजात बालविवाहाची प्रथा होती. त्यामुळे सावित्रीबाईंचा महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी बालविवाह झाला होता. लग्नाच्या वेळी सावित्रीबाई शिक्षित नव्हत्या, परंतु ज्योतिबा फुले यांनी त्यांना लिहायला-वाचायला शिकवले. शिक्षित झाल्यावर सावित्रीबाईंनी आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजातील महिलांना करून देण्याचा निश्चय केला .यासाठी त्यांनी अनेक संकटांना तोंड दिले. त्याकाळी महिलांना घराबाहेर जाऊन शिक्षण घेण्याची परवानगी नव्हती. महिलांना शिक्षण देण्यासाठी त्यांनी अनेक कटू प्रसंगाशी धैर्याने सामना केला. संकटांना न जुमानता सावित्रीबाईंनी चिकाटी व आत्मविश्वासाने महिलांसाठी ज्ञानदानाचे अजिबात नाही आता कार्य केले. सावित्रीबाई यांनी आपले पती ज्योतिबा फुले यांच्या मदतीने पुण्यामध्ये 1848 ते 1852 पर्यंतच्या काळात मुलींसाठी 18 शाळा काढल्या. सावित्रीबाई व ज्योतिबा फुले यांचे शिक्षणाचे योगदान पाहून ब्रिटिश शासनाने त्यांचा गौरव केला. आपल्या विचारांचा प्रसार करण्यासाठी सावित्रीबाई यांनी'काव्यफुले' व'बावनकशी सुबोधरत्नाकर'हे दोन काव्यसंग्रह ही लिहिले.पतीच्या निधनानंतर त्यांनी सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा सांभाळली.सावित्रीबाईं ज्योतिबांच्या प्रत्येक सामाजिक कार्यात हिरीरीने सहभागी होत.
1897 मध्ये प्लेगच्या रुग्णांची सेवा करत असतानाच त्यांनाही या रोगाने ग्रासले अखेर 10 मार्च 1897 रोजी हाडाच्या शिक्षिका,कवयित्री व थोर समाज सुधारक म्हणून प्रसिद्ध असलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई अनंतात विलीन झाल्या. त्यांनी केलेल्या महान कार्याची नोंद घेत महाराष्ट्र आणि केंद्र शासनाने त्यांच्या नावाने अनेक पुरस्कारांची निर्मिती केली . तसेच त्यांच्या स्मरणार्थ एक डाक तिकीट काढण्यात आले.सध्या या महामारीच्या काळात शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण व उपक्रम चालू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आमच्या शाळेच्या सन्माननीय मुख्याध्यापिका सौ.चौधरी बाई यांनी सहकारी शिक्षकांच्या मदतीने विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांचा विकास व्हावा म्हणून इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी पुढील उपक्रमांचे आयोजन केले.
* इयत्ता पहिली ते चौथी च्या विद्यार्थ्यांसाठी 'क्रांतीज्योत सावित्रीबाई फुले 'यांच्या माहितीचे अनुलेखन करणे.
* पाचवी ते सातवी च्या विद्यार्थ्यांनी साठी - 'मी सावित्री बोलतेय.....' एकपात्री अभिनय करणे.
तसेच विद्यार्थ्यांसाठी- 'क्रांतीज्योती ,सावित्रीबाई' यांची माहिती सांगणे.या उपक्रमांचे आयोजन केले होते.
इयत्ता पहिली ते सातवीचे बरेच विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते. प्रत्येक विद्यार्थ्याने आपापल्या वर्गशिक्षकांना व्हाट्सअप च्या माध्यमातून आपले सादरीकरण व लेखन पाठवले . प्रत्येक इयत्तेच्या वर्गशिक्षकांनी त्यातून उत्कृष्ट सादरीकरण व लेखन निवडले.
शाळेच्या सहाय्यकशिक्षिकासौ.मुणगेकर मॅडमयांनी या उपक्रमाचा सुंदर व्हिडिओ बनवला.सदर उपक्रमासाठी शालेय समितीचे माननीय अध्यक्ष व माननीय सदस्य यांनी सर्व शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले.