राष्ट्रीय शिक्षण संस्था
स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर,प्राथमिक डोंबिवली पूर्व
पर्यावरण पूरक गणेशोत्सव "
इयत्ता १ली ते ७वी
"रूप तुझे वंदिण्या,साज शब्दांचे सजले.....
मुखी नाम तुझे आले, हात चरणांशी जुळले...
भक्ती तुझी करण्या देवा, सर्वांग स्फुरले...
भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजे गणेश चतुर्थी या दिवशी गणेशाची मूर्ती वाजत गाजत आणून सजवलेल्या मखरात बसवतात.
त्याची यथासांग पूजा करतात.भक्तिभावाने गणपतीला दुर्वा वाहतात व मोदकांचा नैवेद्य दाखवतात.या दिवसापासून गणेशोत्सवास सुरुवात होते.हा महाराष्ट्रात साजरा केला जाणारा सर्वात मोठा उत्सव आहे.
'गणपती'हे हिंदूंचे एक आराध्यदैवत आहे. संकटांचा नाश करणारे,सुख देणारे महान दैवत आहे.'गणपती' ही विद्येची देवता आहे म्हणून सर्व लहान थोर मोठ्या भक्तिभावाने,आनंदाने गणेशाचे पूजन करतात.गणेशोत्सव साजरा करताना आपल्याला पर्यावरणाचाही विचार करणे गरजेचे आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती नदीपात्रात,समुद्रात विसर्जन करून आपण पाण्याचे प्रदूषण करत असतो त्याऐवजी पारंपारिक शाडूच्या मातीपासून बनवलेल्या गणेशमूर्तींचे पूजन करून कृत्रिम तलावात विसर्जन करणे ही काळाची गरज आहे यामुळे पर्यावरणाची होणारी हानी आपण काही प्रमाणात टाळू शकतो ही बाब लक्षात घेऊन गेल्या वर्षी कला शिक्षक माननीय श्री.चंद्रशेखर संत यांची इको-फ्रेंडली गणेश मूर्ती बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली होती यावर्षी करोनारुपी संकटांमुळे शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना हा उपक्रम घरीच करण्यास सांगितले.
शाळेच्या माननीय मुख्याध्यापिका सौ.शैलजा चौधरी यांनी या उपक्रमाचे नियोजन केले.इयत्ता पहिली ते सातवीच्या वर्ग शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना त्याबाबत सूचना दिल्या काही विद्यार्थ्यांनी गणेशाची मनमोहक रेखाचित्रे काढली तर काहींनी शाडूच्या मातीपासून छोट्या गणेश मुर्त्या बनविल्या त्यांचे फोटो आपापल्या वर्गशिक्षकांना व्हाट्सअपच्यामाध्यमातून पाठविले.शाळेचे सहशिक्षक श्री.मयूर राऊत सर व सौ.मुणगेकर यांनी सर्व चित्रांचे एकत्रीकरण केले.अशाप्रकारे पर्यावरणपूरक इको फ्रेंडली गणेशमूर्तीमुळे पर्यावरणाचे रक्षण होते व कलेतून नवनिर्मितीचा आनंदही मिळतो ही बाब विद्यार्थ्यांच्या लक्षात आली.शाळेच्या सन्मा.मुख्याध्यापिका यांचे सुयोग्य नियोजन,शिक्षकांचे मार्गदर्शन,पालकांचे सहकार्य,विद्यार्थ्यांची कल्पकता,परिश्रम यामुळे सदर पर्यावरण पूरक उपक्रम ऑनलाइनच्या माध्यमातून यशस्वी झाला.भविष्यकाळातकरोनाची परिस्थिती असो वा नसो आपण आपली हीच परंपरा जपणं गरजेचे आहे.यंदा ज्या सकारात्मक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करत आहोत त्याच पद्धतीने पुढच्या वर्षीही करू ,अशी आशा माननीय मुख्याध्यापिका यांनी व्यक्त केली.
शाळा समितीचे सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या या पर्यावरणपुरक उपक्रमाचे कौतुक केले व सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
"गणपती बाप्पा मोरया,पुढच्या वर्षी लवकर या"