दि.१५ डिसेंबर २०२१ रोजी शिक्षण मंडळाचा शाळा सुरू करण्याचा आदेश आला आणि स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर प्राथमिक विभागात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले.कोव्हिड-१९च्या महामारीमुळे उद्भवलेल्या अपरिहार्य परिस्थितीमुळे सुमारे पावणेदोन वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर विद्यार्थी शाळेत येणार होते.शाळेत येणाऱ्या या चिमण्या पाखरांच्या स्वागतासाठी मुख्याध्यापिका,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, यांनी प्रवेशोत्सवाचे पूर्वनियोजन केले.
गुरुवार दि.१६ डिसेंबर या प्रवेशोत्सव दिनी बाळगोपाळांचे सहर्ष स्वागत लेझीम व ढोलताश्यांच्या गजरात करण्यात आले.आकर्षक रांगोळ्यांनी सजलेल्या शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांवर पुष्पवर्षाव करण्यात आला.शालेय समिती पदाधिकारी मा.मुख्याध्यापिका आणि शिक्षकवृंद यांनी अतिशय प्रफुल्लीत मनाने विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प दिले. या मंगलमय वातावरणात इयत्ता ७वी च्या विद्यार्थिनींनी आपला सांस्कृतिक वारसा जपत बालगोपाळांचे औक्षण केले.शिक्षकांनी ऑक्सिमीटरने विद्यार्थ्यांचे तापमान मोजले व त्यांचे हात सॅनिटाइझ केले.अशाप्रकारे कोविड१९ च्या सर्व नियमांचे पालन करून पालकांचे संमतीपत्र स्विकारून विद्यार्थ्यांना रांगेत वर्गात पाठविण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शालेय समितीचे माननीय पदाधिकारी श्री.विद्याधर शास्त्री सर,शाळा समितीचे माननीय सदस्य श्री.शिवकुमार इनामदार सर.मा. सौ.माधवी कुलकर्णी मॅडम,सौ.दीपा आपटे मॅडम, मा.सौ.ललिता जोशी मॅडम,पूर्व प्राथमिक विभाग दत्तनगरच्या विभाग प्रमुख सौ.रश्मी पवार आदी मान्यवर आवर्जून उपस्थित होते.मा.श्रीयुत शास्त्री सर यांचे शुभहस्ते श्रीफळ वाढवून खऱ्या अर्थाने प्रवेश उत्सवाचा प्रारंभ झाला.
प्रवेशोत्सवाच्या मंगल प्रसंगी प्रभागातील मा.नगरसेवक श्री.राजेश मोरे देखील उपस्थित होते.नगरसेवकांच्या शुभहस्ते शारदा पूजन करण्यात आले.तसेच छोटेखानी कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांना सॅनिटायझरच्या बॉटल्सचे मोफत वाटप करण्यात आले.शाळेचे सहकारी शिक्षक श्री.पवार सर यांनी आपल्या ओघवत्या शैलीत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.शाळेच्या माननीय मुख्याध्यापिका सौ.गीतांजली मुणगेकर मॅडम यांचे उत्तम नियोजन,सहकारी शिक्षकांचे अथक परिश्रम, पालकाचे अमूल्य सहकार्य यांमुळे स्वा.वि.वि दत्तनगर प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव खऱ्या अर्थाने आनंदोत्सव म्हणून साजरा झाला.