अरुणोदय शाळेत दीप अमावस्या उत्साहात संपन्न

10 Aug 2021 12:31:57
अरुणोदय शाळेत दीप अमावस्या उत्साहात संपन्न  

deep_1  H x W:  
शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा |
शत्रुबुद्धि-विनाशाय दीपज्योती नमोऽस्तुते |
दिव्या दिव्या दिपत्कार कानीं कुंडलें मोतीहार |
दिव्याला पाहून नमस्कार  ||
दिवा लावला देवांपाशी ,उजेड पडला तुळशीपाशी |
माझा नमस्कार देवांपाशी ||  
           अगदी प्राचीन काळापासून दररोज सायंकाळी तिन्ही सांजेला देवासमोर तेलाचा वा तुपाचा दिवा लावण्याची आपली संस्कृती आहे. दिव्याची ज्योत ही अग्नितत्त्वाचे प्रतिक आहे. तर, दिवा मांगल्याचे प्रतिक आहे. अग्निप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आषाढ अमावस्येला ‘दीपपूजन’ केले जाते. आषाढ अमावास्येला ‘दीपान्वित अमावस्या’ असेही म्हणतात.
             दीप अमावस्येला दिवा लावण्याचे महत्व असून, दीप अमावस्या म्हणजे आषाढ अमावस्या होय. या दिवसानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते. या दिवशी घरातील इकडे तिकडे ठेवलेले, धुळीने माखलेले दिवे, समया, निरांजने, लामणदिवे या सर्वांना एकत्र करून, घासून पुसून लख्ख करून एकत्र मांडतात. त्यांच्या भोवती रांगोळ्या घालतात.सर्व दिव्यांमध्ये तेल वात घालून प्रज्वलित केले जातात. दिव्यांची हळद कुंकू, फुले, अक्षता वाहून मनोभावे पूजा केली जाते व नैवेद्य दाखवला जातो.तसेच तेजाची आराधनाही केली जाते.पुढील मंत्राने दिव्याची प्रार्थना केली जाते.
‘‘दीप सूर्याग्निरुपस्त्वं तेजसां तेज उत्तमम्‌|
गृहाण मत्कृतां पूजां सर्वकामप्रदो भव॥"
‘‘हे दीपा, तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस.तेजा मध्ये तू उत्तम तेज आहेस.माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व ईच्छा पूर्ण कर.’’.तिमिरातून तेजाकडे असा संदेश देणारा अशी दिव्याची ओळख आहे. सध्याच्या कोरोना सारख्या जागतिक संकट काळात सगळ्यांनाच अशा प्रतिकात्मक दीप पूजनाची गरज आहे. जगावर कोरोना सारख्या महाभयंकर संकटाचे सावट आहे.दीप पूजनातून सर्वांना अंधकारमय परिस्थितीशी लढण्याचे बळ मिळो !!!!! अशी या दिव्यापाशी प्रार्थना करून 'दीप पूजन' करण्यात आले.
              स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय ,प्राथमिक शाळेत रविवार दि.०८ऑगस्ट २०२१ रोजी ऑनलाईन पद्धतीने "दीप अमावस्या" साजरी करण्यात आली.तंत्रज्ञानाच्या मदतीने हा उपक्रम पार पडला.विद्यार्थ्यांना Whatsapp वर "दीप अमावस्या" कशाप्रकारे साजरी करावी यासंबंधी सूचना देण्यात आल्या.विद्यार्थ्यांनी आपापल्या घरी सुरेख रांगोळी रेखाटून फुलांची आरास केली व दीप पूजन केले.सदर उपक्रमाची क्षणचित्रे विद्यार्थ्यांनी वर्गशिक्षकांना Whatsapp वर पाठवली .इयत्ता १ली ते इयत्ता ७वी च्या विद्यार्थ्यांचा या उपक्रमास उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.प्रतिकूल परिस्थितीत विद्यार्थ्यांचा सहभाग पाहून मा.मुख्याध्यापक श्री.सुनीत वारके यांनी व सर्व शिक्षकांनी विद्यार्थी व पालक यांचे कौतुक केले.
 

deep_7  H x W:
deep_6  H x W:
deep_5  H x W:
deep_4  H x W:
deep_3  H x W:
deep_2  H x W:
deep_1  H x W:  
Powered By Sangraha 9.0