भारतीय सैनिकांच्या शौर्याची गाथा - कारगिल विजय दिवस
भारत शूर योद्ध्यांची भूमी आहे आणि भारतीय सेना अशा पराक्रमी शूरविरांनी भरलेली आहे. १९९९ साली भारतीय सेनेच्या शौर्याचे पूर्ण जग साक्षीदार बनले; जेव्हा भारतीय सैनिकांनी पाकिस्तानी सैन्याचा पराभव करून कारगिल युद्ध जिंकले .कारगिल युद्धाचे स्मरण करण्यासाठी "कारगिल विजय दिवस" साजरा केला जातो.कारगिल विजय दिवस हा भारतीय सैन्याच्या शौर्याची आठवण सदैव जागृत ठेवणारा दिवस असून देशाबद्दल त्यागाची आणि सैनिकांप्रती कृतज्ञतेची भावना जागृत करणार दिवस आहे.
कारगिल हे लहान शहर असून जम्मू आणि काश्मीर ची राजधानी श्रीनगर पासून २०५किलोमीटर अंतरावर आहे .कारगिल चे हवामान थंड असते.तिथले तापमान -४०अंश सेल्सिअस पर्यंत येऊ शकते.राष्ट्रीय महामार्ग लेह ते श्रीनगर या रस्त्यावर कारगील वसलेले आहे.इसवी सन १९९९च्या उन्हाळ्यात पाकिस्तानी लष्कराने आपल्या अनेक तुकड्यां भारताच्या नियंत्रण रेषे पलीकडे पाठवल्या. कुणाच्याही लक्षात न येता त्यांनी रिकाम्या भारतीय चौक्यांचा ताबा घेतला.
भारताने इसवी सन१९९९ सालच्या जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत अनेक महत्त्वाच्या लढाया केल्या व अनेक जागा ताब्यात घेतल्या. २६ जुलै १९९९ रोजी भारतीय सैन्याच्या जवानांनी कारगीलमध्ये प्रतिकूल परिस्थितीत शत्रू सैन्याला नामोहरम केले.कारगील युद्धामध्ये आपले भरपूर सैनिक शहीद झाले .देशासाठी शहीद झालेल्या वीरांच्या शौर्याची व बलिदानाची आठवण करून आपली देशभक्ती जागृत करण्यासाठी कारगिल विजय दिवस साजरा केला जातो .
स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय प्राथमिक शाळेतही सोमवार दिनांक २६ जुलै २०२१ रोजी कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. २६ जुलै १९९९ च्या कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांना शाळेचे मुख्याध्यापक श्री. सुनीत वारके व सर्व शिक्षक कर्मचारी यांनी अभिवादन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांना कारगिल विजय दिवस म्हणजेच कारगिल युद्धाची माहिती ऑनलाईन पद्धतीने सांगण्यात आली. सौ. सुरेखा सूर्यवंशी , सौ.सीमा पवार व सौ.लता मोरे यांनी अनुक्रमें इ.५वी , इ.६ वी व इ.७वीच्या विद्यार्थ्यांना गुगल मीट वर कारगिल युद्धाची माहिती दिली.