‘युज्’ या मूळ संस्कृत धातूपासून ‘योग’हा शब्द तयार झाला. योग या शब्दाचा अर्थ "जोडणे' असा आहे.आपलं शरीर, मन आणि आत्मा यांना जोडणे म्हणजेच योग होय.आरोग्य या शब्दाची व्याख्या, "शरीर, मने, अध्यात्म आणि सामाजिक दृष्ट्या तंदुरुस्ती' अशी आहे.योग ही सर्वांगीण आरोग्यपूर्ण जीवनशैली आहे असे म्हणायला हरकत नाही. योग ही अशी निरंतर प्रक्रिया आहे जी कायिक, वाचिक आणि मानसिक या तीनही पातळींवर स्थैर्य प्रदान करून माणसाला सर्वार्थाने निरोगी ठेवते.
दरवर्षी २१ जून रोजी जगभरात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा केला जातो. भारताचे पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन' म्हणून साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांच्या सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता. सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स, रशिया यासारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत. यावर विस्तृत चर्चा झाल्यानंतर डिसेंबर २०१४ मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली. २१ जून २०१५ रोजी पहिला ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’जगभर साजरा करण्यात आला.
२१ जून हाच दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून का ठरवण्यात आला याचे कारण त्या दिवसाच्या वैशिष्ट्यातच दडले आहे. २१ जूनच्या दिवसाचे एक वैशिष्ट्य म्हणजे तो दिवस वर्षाच्या ३६५ दिवसांतील सर्वात मोठा दिवस आहे आणि योगाचा सतत अभ्यास केल्यास एखाद्या व्यक्तीला दीर्घायुष्य मिळते, म्हणून हा दिवस योग दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावर्षी सोमवार दिनांक २१ जून २०२१ रोजी ७वा ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ मोठ्या उत्साहात ठिक ठिकाणी साजरा करण्यात आला.
स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय, प्राथमिक शाळेतही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ सोमवार दिनांक २१ जून २०२१ रोजी ऑनलाइन पद्धतीने साजरा करण्यात आला. या दिवशी शाळेतील इयत्ता दुसरी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी आपापल्या घरोघरी वेगवेगळी योग प्रात्यक्षिके केली व सदर कार्यक्रमाची क्षणचित्रे काढून Whatsapp च्या माध्यमातून वर्गशिक्षकांकडे पाठवली. विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे प्रतिसाद नोंदवला. शाळेच्या मुख्याध्यापिका मा.सौ.ज्योती वानखेडे यांनी सर्व विद्यार्थी व पालक त्यांचे कौतुक केले.
शाळेतही कोरोनाचे सर्व नियम पाळत ७वा ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.शाळेतील ज्येष्ठ शिक्षक श्री. शांताराम अहिरे यांनी योगातील सूक्ष्म व्यायाम प्रकार ,विविध योगासने ,काही प्राणायाम शिक्षकांकडून करून घेतले.शेवटी सर्व शिक्षकांनी ध्यान साधना केली .शाळेच्या मुख्याध्यापिका मा.सौ.ज्योती राजेंद्र वानखेडे यांच्या पूर्व नियोजनानुसार ७वा ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ मोठ्या उत्साहात संपन्न झाला .
अनेक कारणांमुळे येणारे नैराश्य ,ताणतणाव यांवर योगासने हे अगदी रामबाण औषध आहे. योगासनांमुळे शरीर आणि मन दोन्ही सशक्त आणि सक्षम बनू शकते. सध्याच्या कोरोनाच्या काळात आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवणे सर्वात महत्त्वाचेआहे . आणि त्यासाठी योग हाच एकमेव उपाय आहे .त्यामुळे कोरोनाविरोधातील लढाई आपण आपल्याच पद्धतीने आणखीन बळकट करू शकतो. शेवटी असेच म्हणावेसे वाटते......
"योगाची दिव्य पताका भारत देशी मिरवूया.
योग शिकू अन् शिकवूया.”