सण आज आहे रक्षाबंधनाचा - नेत्रांच्या निरांजनाने भावास ओवाळण्याचा !!!!
04 Aug 2020 17:59:13
सण आज आहे रक्षाबंधनाचा - नेत्रांच्या निरांजनाने भावास ओवाळण्याचा !!!!
भारतीय संस्कृतीमध्ये सण-उत्सव साजरे करण्याची परंपरा फार प्राचीन काळापासून चालत आलेली आहे.आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सण-उत्सव यांना खूप महत्व आहे. माणसांना जवळ आणण्याचे ,एकत्र बांधून ठेवण्याचे, भावनिक एकोप्याबरोबरच एकात्मता साधण्याचे मौलिक सांस्कृतिक कार्य सण व उत्सव करत असतात.वर्षभर आपण अनेक सण व उत्सव साजरे करतो.त्यातीलच एक महत्वाचा सण म्हणजे रक्षाबंधन!!!!!!!
रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाच्याप्रेमाचं अतूट नातं !या दिवशी बहीण भावाच्या हातावर राखीबांधते.जगातील सर्व नात्यांमध्ये भावा बहिणीचे नाते हे सर्वात पवित्र मानले जाते. या दिवशी भाऊही बहिणीलारक्षण करण्याचे वचन देतो. श्रावण पौर्णिमेस राखी बांधली जाते. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची मंगल मनोकामना असते.रक्षाबंधन म्हणजे भावाने बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी घेणे,रक्षाबंधन म्हणजे बहीण-भावाच्या प्रेमाचा नित्य नियमित वाहणारा निर्झर !भावा-बहिणीच्या प्रेमाचा संदेश देणारा हा सण म्हणजे भारतीय संस्कृतीचा अमोल ठेवा आहे.एकमेकांना जोडणारा असा हा सण इतर कोणत्याही धर्मात ,संस्कृतीत नाही. सामाजिक ऐक्याची भावना जागृत ठेवण्यासाठी अशा प्रकारचे सण खूप महत्वाचे ठरतात. रक्ताच्या नात्या व्यतिरिक्त आपल्या मनाप्रमाणे नाती जोडण्यास ह्या सणामुळे समाजास वाव मिळतो. ज्या समाजात अशा प्रकारची एकरूपता, ऐक्य असते असा समाज सामर्थ्यवान बनतो हाच या राखी पौर्णिमेचा संदेश आहे.
सोमवार ०३ ऑगस्ट २०२० रोजी आमच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय ,प्राथमिक शाळेतOnline पद्धतीने"रक्षाबंधन"हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ‘रक्षाबंधन’चे औचित्य साधून इयता २री ते इयता ७वीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘पर्यावरणपूरक राखी बनवणे’हा उपक्रम घेण्यात आला.विद्यार्थ्यांनी घरात उपलब्ध असलेल्या साहित्याचा वापर करून फार सुंदरअशा राख्या बनवल्या व त्याची छायाचित्रे WhatsAppच्या माध्यमातून वर्गशिक्षकांना पाठवली.विद्यार्थिनींनी याच राख्यांचा वापर करून रक्षाबंधन केले.या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी स्वनिर्मितीचा आनंद अनुभवला. आपले सण व उत्सव समारंभ ,परंपरा विद्यार्थ्यांना माहित करून देणे हा या मागचा उद्देश आहे.शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.ज्योती राजेंद्र वानखेडे यांनी विद्यार्थ्यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.