अरुणोदयच्या विद्यार्थ्यांनी केला संकल्प 'पर्यावरणस्नेही' होण्याचा
23 Aug 2020 20:22:09
अरुणोदयच्या विद्यार्थ्यांनी केला संकल्प 'पर्यावरणस्नेही' होण्याचा
वक्रतुंड महाकाय सुर्यकोटी समप्रभः
निर्विघ्नं कुरूमे देव सर्वकार्येषु सर्वदा
हिंदू धर्मीयांची आराध्यदेवता म्हणजे श्री गणराय!!!! भाद्रपद महिन्यात शुध्द चतुर्थीला येणारा गणेशोत्सव म्हणजे सर्वांचा अत्यंत प्रिय सण!!! मोठया आनंदाने, उत्साहाने आणि चैतन्याने हा सण साजरा होताना आपल्याला पहायला मिळतो.हिंदू धर्मात गणपतीला फार महत्त्वाचे स्थान आहे. सर्व प्रकारच्या शुभकार्यात सर्वप्रथम गणपतीचे पूजन[गणेशपूजा] केले जाते.गणपतीला विद्येचे दैवत मानले जाते. गणपती हे आराध्य दैवत म्हणूनही ओळखले जाते. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणरायाची विधिवत प्रतिष्ठापना करून त्याची मनोभावे पूजा केली जाते.हा सण अनंत चतुर्दशी पर्यंत मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जातो.मोठ्या भक्तिभावाने ,मनोभावे श्री गणरायाची पूजा केली जाते.मात्र विसर्जनाचा दिवस जसजसा जवळ येतो तसतशी आनंदाला दु:खाची किनार स्पर्शून जाते.प्रत्यक्ष विसर्जना दिवशी गणेशाची ती लोभस ,राजस मूर्ती पाण्यात विसर्जित होत असताना मुखी आरत्या असल्यातरी मनात एक प्रकारचे काहूर उठलेले असते.डोळ्याच्या पापण्या ओलावतात व “गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला” हे उद्गार नकळत ओठी येतात.
गणेशोत्सवाचे महत्त्व लक्षात घेऊनच लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी लोकसहभाग महत्त्वाचा मानून त्याला सार्वजनिक रूप दिले. पारतंत्र्याचा काळ असल्याने लोकांनी एकत्र यावे, त्यांच्यात जागृती निर्माण व्हावी हा हेतू त्यामागे होता. १८९२ साली लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी हा गणेशोत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरा करायला सुरवात केली.
कोणताही उत्सव साजरा करताना पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेणे आवश्यक आहे. गणेशोत्सवामधील पावित्र्य आणि पर्यावरण संरक्षण यासाठी गणेशोत्सव 'पर्यावरणपूरक' पद्धतीने साजरा होणे ही काळाची गरज आहे. गणेशोत्सवाचे पावित्र्य आणि पर्यावरणाचे संतुलन राखण्याची जबाबदारी आपणां सर्वांची आहे. यासाठी आपण सर्वांनी आग्रही राहणे आवश्यक आहे. प्रत्येकाने आपला दृष्टिकोन पर्यावरणस्नेही ठेवला तरच उत्सव साजरे करण्याबाबत सामाजिक परिवर्तन होऊ शकेल. आणि प्रत्येक सण ‘पर्यावरणपूरक’पद्धतीने साजरा होईल यात शंकाच नाही !!!!!
आजचा विद्यार्थी हा भावी नागरिक आहे.आजच त्यांच्या मनांत पर्यावरणाचे महत्व बिंबवणे गरजेचे आहे.विद्यार्थ्यांना 'पर्यावरणस्नेही' बनवणे ही आपणां सर्वांची जबाबदारी आहे.हे लक्षात घेऊन आमच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय ,प्राथमिक शाळेत ‘गणेशोत्सवाचे’औचित्य साधून दिनांक २१ ऑगस्ट २०२० रोजी ‘चित्रकला’ व ‘पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवणे’ हे उपक्रम घेण्यात आले.इयत्ता १ली व इयत्ता २री च्या विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनेतील ‘श्री गणेशाचे’ चित्र रेखाटले .तर इयत्ता ३री ते इयत्ता ७वीच्या विद्यार्थ्यांनी ‘पर्यावरणपूरक गणेशमूर्ती’ बनवल्या.या गणेशमूर्ती बनवताना त्यांनी शाडूमाती ,कागदाचा लगदा ,घरातील विविध डाळी ,जुनी वर्तमानपत्रे यांचा वापर केला. त्यानंतर त्या गणेशमूर्तीची विधिवत पूजा केली.सदर कार्यक्रमाची क्षणचित्रे विद्यार्थ्यांनी Whatsappच्या माध्यमातून वर्गशिक्षकांना पाठवली.पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करून सर्वांनीच आपला आनंद द्विगुणीत केला.
‘कोरोना’जागतिक संकट काळातही विद्यार्थ्यांचा उत्साह पाहून शाळेच्या मुख्याध्यापिका मा.सौ.ज्योती वानखेडे यांनी विद्यार्थी व पालक यांचे कौतुक केले.