आई म्हणजे ममता ,वात्सल्य ,प्रेम...... आत्मा आणि ईश्वर या दोघांचा संगम म्हणजे आई होय. "आई" हाशब्द मानवी भावनांशी निगडित असून त्यास माणसाच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे. क्षमाशील वृत्तीने मुलांचा अपराध पोटात घालणारी, संकटाच्या वेळी मुलांवर मायेचा पदर पांघरून मुलांना कुशीत घेणारी, त्यांच्या कल्याणासाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग करणारी आई ही परमेश्वराचेच दुसरे रूप आहे, असेच म्हणावे लागेल. आईचं असंच यथार्थ वर्णन करणारी कविवर्य फ. मुं. शिंदे यांची ‘आई’ही कविता अशीच बोलकी आहे.आईचे अनन्यसाधारण महत्व खालील ओळी वर्णून जातात.
आई खरंच काय असते?
लेकराची माय असते,
वासराची गाय असते,
दुधाची साय असते,
लंगडय़ाचा पाय असते!
आई असते जन्माची शिदोरी
सरतही नाही, उरतही नाही!’
अशा या प्रेमस्वरूप,वात्सल्यसिंधू आई बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे 'मातृदिन' !!!!!!!!मातृदिन हा उत्सव आईचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो.भारतामध्ये श्रावण अमावस्येच्या दिवशी 'मातृदिन 'साजराकेला जातो. आपल्या आईबद्दल आदर प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. भारतीय संस्कृतीमध्ये मातेचं स्थान अतिशय उच्च असल्याचे सांगण्यात आलेले आहे. माता ही आपली सर्वश्रेष्ठ गुरु मानली गेली आहे.
स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय, प्राथमिक शाळेतमंगळवार दिनांक १८ ऑगस्ट २०२० रोजी Online पद्धतीने मातृदिन साजरा करण्यात आला. मातृदिनानिमित्त इयत्ता २री ते इ.७वी च्या विद्यार्थ्यांनी घरातील उपलब्ध वस्तू पासून सुबक भेटकार्ड निर्मिती करून आईचे औक्षण केले . स्वनिर्मित भेटकार्ड आईला भेट म्हणून दिले. भेटकार्डात सुंदर अशा काव्यपंक्तींचे लेखन करीत आईचे जीवनातील महत्त्व विशद करण्याचा सुंदर प्रयत्न केला .सदर घरगुती कार्यक्रमाची क्षणचित्रे आपापल्या वर्गशिक्षकांना Whastapp माध्यमातून पाठविली.सर्व सहभागी विद्यार्थी व पालक यांचे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.ज्योती वानखेडे यांनी कौतुक केले व मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या .