विद्यार्थ्यांनी गायिली गुरुची महती" गुरु ईश्वर तात माय ,गुरुविण जगी थोर काय ?"

17 Oct 2019 18:50:53
 
विद्यार्थ्यांनी गायिली गुरुची महती "गुरु ईश्वर तात माय ,गुरुविण जगी थोर काय ?"
 
      आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजे गुरू पौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. महर्षि व्यासांना नमन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगल दिन आहे. महर्षि व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार मानले जातात.
“गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः ll
गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः ll”
      गुरू हे प्रत्यक्ष ब्रह्मा, विष्णु आणि शिव आहेत. ते साक्षात परब्रह्मच आहेत. अशा श्रीगुरूंना मी नमन करतो. असा या श्लोकाचा अर्थ आहे. भक्ताला ज्ञानाची प्राप्ती होते, ती केवळ गुरुमुळेच. त्यामुळे कितीही मोठा माणूस असला तरी त्याला मिळणारे ज्ञान, आत्मज्ञान या सर्वांच्या प्राप्तीसाठी गुरुची आवश्यकता असतेच. गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर आहे. जलाशयात पाणी विपुल आहे, परंतु घटाने-घागरीने आपली मान खाली केल्याशिवाय म्हणजे विनम्र झाल्याशिवाय पाणी मिळू शकत नाही. त्याप्रमाणे गुरूजवळ शिष्याने नम्र झाल्याविना त्याला ज्ञान प्राप्त होणार नाही .अंध:काराचा नाश करून ज्ञानाचा प्रकाश देणारा गुरू असतो. जो सकल जीवास चांगले शिकवितो. संस्कार देतो तो गुरू.गुरुचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
“गुरुविण कोण दाखवील वाट?
आयुष्याचा पथ हा दुर्गम, अवघड डोंगर घाट।।"
      आयुष्यात अत्यंत यशस्वी व मोठ्या असणार्‍या प्रत्येक व्यक्ती त्यांच्या गुरुच्या मार्गदर्शनाखाली, त्यांनी दाखवलेल्या वाटेवरून, पुढे जात मोठ्या झाल्या.एकलव्याला गुरुने नाकारले तरीहि त्याने आपल्या गुरुंचा पुतळा उभा करून धनुर्विद्येचा अभ्यास केला. या मागचा भावार्थ असा, आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अथक परिश्रम तर हवेच पण त्याला श्रद्धेची, विश्वासाची जोडही हवी.पौर्णिमा म्हणजे प्रकाश. गुरु शिष्याला ज्ञान देतात. तो ज्ञानाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचावा, म्हणून गुरूची प्रार्थना करावयाची, तो हा दिवस.गुरू म्हणजे ईश्वराचे सगुण रूप. वर्षभर प्रत्येक गुरु आपल्या भक्तांना बोधामृत भरभरून देत असतात. त्या गुरूंच्या प्रति अनन्य भावाने कृतज्ञता व्यक्त करणे, हा गुरुपौर्णिमा साजरा करण्या मागील उद्देश आहे.
         डोंबिवलीतील नामांकित शिक्षण संस्था म्हणजे राष्ट्रीय शिक्षण संस्था .या संस्थेतील सर्व शाळांत मोठ्या उत्साहाच्या वातावरणात गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. आमच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय प्राथमिक शाळेत या वर्षी दिनांक १६ जुलै २०१९ रोजी गुरुपौर्णिमा अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली.शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. ज्योती वानखेडे यांनी महर्षी व्यास यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.त्यानंतर श्री. शांताराम अहिरे सर यांनी गुरुपौर्णिमेचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले. विद्यार्थ्यांनी शाळेतील शिक्षकांना वंदन करून त्यांचे आशीर्वाद घेतले. या दिवशी .विदयार्थ्यांच्या खालीलप्रमाणे स्पर्धा घेण्यात आल्या.
इ.१ ली व २ री :- १ ते १० मनाचे श्लोक म्हणणे.
सहभागी विद्यार्थी :- १५०
इयत्ता ३ री व ४ थी :- गुरुशिष्यांच्या गोष्टी सांगणे.
सहभागी विद्यार्थी :-१६०
इयत्ता ५ वी तो ७ वी :- गुरू पौर्णिमा दिनाचे महत्व सांगणे.
सहभागी विद्यार्थी : १७५
     शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.ज्योती वानखेडे यांनी सर्व विद्यार्थ्याना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.भारतीय संस्कृतीत गुरूंना खूप महत्वाचे स्थान आहे .ही गुरु परंपरा आधुनिक काळातही टिकून रहावी हाच या उपक्रमामागचा उद्देश.

 
 

 
Powered By Sangraha 9.0