प्रखर राष्ट्रभक्ति ,असीम त्याग यांचे मूर्तिमंत प्रतीक .....लो.टिळक

Source :    Date :03-Aug-2021
प्रखर राष्ट्रभक्ति ,असीम त्याग यांचे मूर्तिमंत प्रतीक .....लो.टिळक

tilak_1  H x W: 
                    आपल्या भारत मातेला इंग्रजांच्या पारतंत्र्याच्या शृंखलांतून मुक्त करण्यासाठी ,आपले सर्वस्व पणाला लावणारे अनेक सुपूत्र भारत भूमीत जन्माला आले;ज्यांनी कशाचाही विचार न करता आपला पूर्ण देह भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी चंदनाप्रमाणे झिजवला.भारतीय राष्ट्रीय चळवळीचे जनक म्हणून ओळखले जाणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे त्यांतीलच एक!!!“स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच !!” या त्यांच्या घोषणेने युवकांना स्वराज्य  मिळवण्यासाठी राष्ट्रीय चळवळीच्या काळात एक नवीन प्रेरणा दिली होती.
"कितीही संकटं आली,
आभाळ जरी कोसळलं तरी,
त्यावर पाय ठेवून उभा राहीन मी !!"
असा जगण्याचा मूलमंत्र देणारे युगपुरुष म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक !!! लो.टिळक यांनी खर्‍या देशप्रेमा प्रमाणेच स्वातंत्र्यलढ्यात देखील महत्वाची भूमिका बजावली.तसेच समाजात पसरलेल्या सर्व वाईट गोष्टी दूर करण्याचाही त्यांनी प्रयत्न केला.ते एक महान स्वातंत्र्यसेनानी, एक उत्तम समाज सुधारक, एक आदर्शवादी राष्ट्रीय नेते, प्रख्यात वकील, प्रसिद्ध लेखक आणि एक महान विचारवंत होते.तसेच भारतीय इतिहास, हिंदू धर्म, संस्कृत, खगोलशास्त्र, गणिताचे अभ्यासक होते. म्हणजेच लोकमान्य टिळक हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार असेही संबोधले जाते.आपल्या भारतमातेच्या अशा या थोर सुपुत्रांचे स्मरण म्हणजे कर्तृत्वाच्या प्रेरणेचा अखंड वाहणारा निर्झर !!!! त्यांच्या जीवनचरित्रातून आपल्याला बोध , मार्गदर्शन व स्फूर्ती मिळते.अशा या ‘लोकमान्य’ पदवी प्राप्त झालेल्या ध्येयवादी आणि थोर व्यक्तिमत्त्वाची ० ऑगस्ट या दिवशी पुण्यतिथी साजरी केली जाते.
          राष्ट्रीय शिक्षण संस्था संचलित स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय, प्राथमिक शाळेतही रविवार दिनांक ०१ ऑगस्ट २०२१ रोजी "लोकमान्य टिळक पुण्यतिथी" ऑनलाईन पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरी झाली. लोकमान्य टिळक यांचा जीवन परिचय करणारी चित्रफीत  Whatsapp द्वारा प्रसारित करण्यात आली.या दिवसाचे औचित्य साधून इयत्ता १ली ते इयत्ता ७वी च्या विद्यार्थ्यांसाठी "वक्तृत्व"स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.इयत्ता १ली ते इयत्ता ४थी च्या विद्यार्थ्यांसाठी "लोकमान्य टिळकांची माहिती सांगणे" व इयत्ता ५वी ते इयत्ता ७वी च्या विद्यार्थ्यांसाठी "लोकमान्य टिळक - गुण वैशिष्ट्ये" असे विषय देण्यात आले.विद्यार्थ्यांनी स्वतःच्या भाषणाचे चित्रीकरण करून सदर चित्रफित शिक्षकांना Whatsapp च्या माध्यमातून पाठवली.या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. शाळेचे मुख्याध्यापक श्री.सुनीत वारके व सर्व सहकारी शिक्षक यांच्या सुनियोजनामुळे हा उपक्रम व्यवस्थितरीत्या पार पडला.