गुरु ईश्वर तात माय ,गुरुविण जगी थोर काय !!!

Source :    Date :26-Jul-2021
गुरु ईश्वर तात माय ,गुरुविण जगी थोर काय  !!!
gurupornima_1   
             भारतात पूराण काळापासून गुरू-शिष्य परंपरा आहे. त्याकाळी शिष्य स्वतःच्या घराचा त्याग करून गुरूगृही राहत असत. ज्ञानप्राप्तीसाठी शिष्याला सुखवस्तू जीवनाचा त्याग करावा लागत असे. ज्ञानप्राप्तीनंतर गुरूला गुरूदक्षिणा देण्यासाठी गुरूपौर्णिमा साजरी केली जात असे. आता मात्र गुरूकुल परंपरा कमी झाली आहे. मात्र गुरूकडून ज्ञान घेण्याची प्रथा आजही तशीच आहे. जीवनातील चांगल्या अथवा कठीण प्रसंगी आजही आपल्या गुरूकडून मार्गदर्शन घेण्यासाठी शिष्य आपल्या गुरूंची भेट घेतात. तिथीनुसार आषाढ महिन्यातील शुद्ध पौर्णिमेला ‘गुरूपौर्णिमा’ साजरी केली जाते. 'गुरूपौर्णिमा’ हा भारतातील एक महत्त्वाचा सण आहे. आषाढ महिन्यातील शुद्ध पौर्णिमेला गुरूपौर्णिमा साजरी केली जाते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी व्यासपूजाही केली जाते. महर्षि व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार म्हणून ओळखले जातात. तसेच महर्षी व्यासांना आद्यगुरू म्हणूनही संबोधले जाते .भारतीय संस्कृतीत गुरूंना देवाप्रमाणे मानले जाते. म्हणूनच गुरूपौर्णिमेला गुरूपूजनदेखील केले जाते.
गुरू ब्रह्मा गुरर्विष्णु, गुरू र्देवो महेश्वर:
गुरू साक्षात परब्रह्म , तस्मै श्री गुरूवे नम:
 गुरु हेच ब्रह्म , गुरु हेच विष्णू आणि गुरु हेच भगवान शंकर ,गुरु हेच साक्षात परब्रह्म ,अशा गुरूला मनापासून प्रणाम!!!!
    गुरूचा महिमा अपार आहे. तो शब्दात गुंफता न येण्यासारखा आहे. गुरू या शब्दाचा अर्थ आहे अंधारातून प्रकाशाच्या वाटेकडे नेणारा! म्हणजेच अज्ञानाचा अंधकार मिटवून ज्ञानरूपी प्रकाशाकडे नेणारा तो गुरू! गुरूला परमेश्वरा पेक्षाही मोठा दर्जा दिला जातो. म्हणून संत कबीर आपल्या एका दोह्यात म्हणतात
गुरुगोविंद दोउ खड़े ,का के लागूं पाय l
बलिहारी गुरू आपणे , गोविंद दियो मिलाय ll
       गुरु आणि गोविंद एकाच वेळी आपल्यासमोर उभे राहिले तर कोणाचे चरण स्पर्श करावे ,गुरुचे का परमेश्वराचे? अशावेळी गुरु चरणी लीन व्हावे कारण गुरु मुळेच परमेश्वराचे दर्शन घेण्याचे भाग्य लाभले.
          विद्यार्थ्यांनादेखील या गुरु शिष्य परंपरेचे दर्शन व्हावं व आपल्या संस्कृतीचा समृद्ध वारसा समजावा यासाठी आमच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय प्राथमिक शाळेत शुक्रवार दिनांक २३जुलै २०२१ रोजी ऑनलाईन पद्धतीने गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक श्री.सुनीत वारके यांनी  आद्यगुरु व्यास यांच्या प्रतिमेचे पूजन केले व पुष्पहार अर्पण केला. श्री.सुनीत वारके यांनी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना भेटवस्तू व पूष्प देऊन गुरुपौर्णिमेच्या  शुभेच्छा दिल्या .इयत्ता १ ली ते ४ थीसाठी 'गुरु-शिष्यांच्या गोष्टी'इयत्ता ५वी ते ७वी साठी 'आधुनिक गुरु-शिष्य' यावर आधारित वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी सदर वक्तृत्वाचे व्हिडिओ बनवून वर्ग शिक्षकांकडे पाठवले.कोरोना सारख्या जागतिक संकट काळात विद्यार्थी व पालक यांचा उस्फूर्त प्रतिसाद पाहून  शाळेचे मुख्याध्यापक श्री.सुनीत वारके यांनी विद्यार्थी व पालक यांचे कौतुक केले .