आपला मान ,आपला आत्मसन्मान ........ भारतीय संविधान
२६ नोव्हेंबर रोजी भारतभर 'संविधान दिन 'साजरा केला जातो. २९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या राज्यघटनेच्या निर्मितीसाठी मसूदा समिती स्थापन झाली. अनेक बैठका व चर्चासत्रांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान समितीने स्वीकारला होता. भारताची राज्यघटना २६ नोव्हेंबरला तयार झाली असली तरी ही घटना २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय जनतेला अर्पण करण्यात आली . लाहोर येथे झालेल्या काँग्रेस च्या अधिवेशनात संपूर्ण स्वराज्याची मागणी पहिल्यांदा करण्यात आली आणि २६ जानेवारी हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून प्रतिकात्मक स्वरूपात साजरा केला जाईल असा ठराव झाला होता. पण आपल्याला प्रत्यक्षात स्वातंत्र्य मिळाले ते १५ ऑगस्टला, त्यामुळे इतिहासातील या दिवसाचे महत्व अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने २६ नोव्हेंबर ला घटना तयार होऊन ही ती २६ जानेवारी ला जनतेस अर्पण करण्यात आली आणि हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करण्याचे ठरले.तर ज्या दिवशी संविधान सभेने संविधानाला मान्यता दिली तो दिवस म्हणजे २६ नोव्हेंबर हा 'संविधानदिन 'म्हणून साजरा केला जातो.
मंगळवार दिनांक २६ नोव्हेंबर २०१९ रोजी आमच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय प्राथमिक शाळेत "भारतीय संविधान दिन " साजरा करण्यात आला. सर्वप्रथम भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. ज्योती राजेंद्र वानखेडे यांनी पुष्पाहार अर्पण केला. तसेच संविधानाच्या प्रास्ताविकेच्या फोटोसही पुष्पाहार अर्पण केला. त्यानंतर श्री. शांताराम अहिरे सर यांनी संविधान दिनाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले. तदनंतर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. ज्योती राजेंद्र वानखेडे यांनी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले व त्यांच्या मागून शिक्षक व विद्यार्थ्यांनी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे उच्चारण केले. त्यानंतर भारतीय संविधान दिनाच्या निमित्त विद्यार्थ्यांनी घोषणा दिल्या .सर्व शालेय परिसर या घोषणांनी निनादून गेला.
१. भारतीय संविधान चिरायु होवो .
२. संविधानावर निष्ठा , हीच व्यक्तीची प्रतीष्ठा
३. भारत माझी माउली ,संविधान त्याची सावली
४. संविधानाचा सन्मान ,हाच आमचा अभिमान
५. लोकशाहीचा जागर ,संविधानाचा आदर