शिक्षण हा मानवी अधिकारांचा मूलभूत पाया... या शिक्षणाचे संगोपन एका विशिष्ट शिस्तीत झाले तर ते अधिकच बहरते. शिक्षणाला शिस्तीची जोड देत एक सक्षम, जबाबदार पिढी घडविण्याचे काम डोंबिवलीतील राष्ट्रीय शिक्षण संस्था गेली ५० वर्षे अवितरपणे करत आहे. यंदाचे हे या संस्थेचे सुवर्णमहोत्सवी वर्ष असून त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन संस्थेने केले आहे.
महाराष्ट्रातील एक सांस्कृतिक नगरी म्हणून डोंबिवलीची सर्वमान्य ओळख. पण, आपल्या या संस्कृतीप्रधान ख्यातीबरोबरच शैक्षणिक क्षेत्रातही या शहराने आपली एक विशिष्ट छाप उमटवली आहे. बहुरंगी, बहुढंगी सांस्कृतिक उपक्रमांबरोबर डोंबिवलीत शैक्षणिक उपक्रमांचीही प्रचंड रेलचेल पाहायला मिळते. कारण, केवळ सांस्कृतिक वारसा महत्त्वाचा नाही, तर तो समजून घेण्यासाठी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी शिक्षणाशिवाय गत्यंतर नाहीच. अशीच एक शिक्षण क्षेत्रात अग्रेसर संस्था म्हणजे डोंबिवलीची राष्ट्रीय शिक्षण संस्था.
दि. १ मे १९६७ साली राष्ट्रीय शिक्षण संस्थेची स्थापना झाली आणि बघता बघता डोंबिवली शहरात पाच व इतरत्र अशा एकूण २४ शाळांपर्यंत या संस्थेने मजल मारली. डोंबिवली पूर्वेतील गोपाळनगर, दत्तनगर, रामचंद्र नगर तर पश्चिमेतील अरुणोदय आणि राणाप्रताप शाळांचे नाव यामध्ये प्रामुख्याने घ्यावे लागेल. सेवाभावी वृत्तीने प्रेरित होऊन मातृभाषेतून राष्ट्रीय शिक्षण प्रदान करणारी आणि सामाजिक उन्नयनाचे निर्मळ कार्य करणारी ही संस्था खर्या अर्थाने लोकादरास पात्र ठरली आहे. या संस्थेला इतक्या उंचीवर नेऊन ठेवणार्या या सेवाभावी, त्यागी वृत्तीच्या आधारस्तंभांनी आधी ‘प्रपंच करावा नेटका | मग जावे परमार्थ विवेका’ या समर्थांच्या उक्तीला प्रत्यक्ष जीवनात कृतीत उतरविले. म्हणूनच ’सत्यम् शिवम् सुंदराचे’ हे प्रतीक समस्त डोंबिवलीकरांचे ’अधिष्ठान’ झाले आहे. या संस्थेचे रोपटे कै. बाबासाहेब मोकाशी यांनी लावले व आज त्याच्या झालेल्या वटवृक्षासारख्या विस्तारासाठी या संस्थेतील सदस्यांचा मोलाचा वाटा आहे. या संस्थेअंतर्गत शैक्षणिक संकुले चालवली जात असून स्वामी विवेकानंद कला व वाणिज्य रात्र महाविद्यालयही कार्यरत आहे.
दरवर्षी या शैक्षणिक संकुलातून हजारो विद्यार्थी आपले माध्यमिक, महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून पुढील शिक्षणासाठी सज्ज होतात. तसेच कसारासारख्या दुर्गमभागात चिश्वाची वाडी येथे आदिवासी बांधवांसाठी स्वामी विवेकानंद आश्रमशाळा चालविली जाते. या संस्थेच्या वतीने मातृभाषेतून शिक्षण देण्यावर प्रामुख्याने भर देण्यात येतो. तसेच विविध संकल्पनांच्या, उपक्रमांच्या माध्यमातून शिक्षणाला आधुनिकतेची जोड देत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी ही संस्था समर्थपणे सांभाळत आहे. या संस्थेच्या माध्यमातून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांनी देश-विदेश पातळीवर आपल्या शिक्षणाच्या, अफाट बुद्धिमत्तेच्या, जिद्दीच्या, ध्यासाच्या बळावर आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे.
या संस्थेअंतर्गत शिक्षणाचे धडे घेतलेली काही नामवंत व्यक्तिमत्त्वे म्हणजे अभिनेत्री व निर्माती ऐश्वर्या नारकर, कबड्डीपटू निलेश शिंदे, संगीतकार तुषार देवल, सूत्रसंचालक सुवर्णा जोशी, राजकारणातील नितीन पाटील, निर्माता- दिग्दर्शक रवी जाधव व अजित देवळे, साहित्य क्षेत्रातील राजस वैशंपायन, डॉ. प्रसाद भिडे, वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. विश्वनाथ मसुरकर अशा अनेक नामवंत व्यक्तींच्या जडणघडणीत या संस्थेचा महत्त्वाचा वाटा आहे. अशा अनेक विद्यार्थ्यांचा नामोल्लेख करावा लागेल. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा आणि त्यांच्या नेतृत्वाचा, दातृत्वाचा, कर्तृत्वाचा संस्थेला कायमच अभिमान आहे... ही पिढी संस्थेचा कायमस्वरूपी फार मोठा ’ठेवा’ आहे आणि हा ठेवा संस्थेने आपल्या ’अंतरी’ अलवार जपलेला आहे. या संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर मनासारखे संस्कार घडविणारा ’शिक्षकवृंद’ आजही विद्यार्थीप्रिय आणि समाजप्रिय आहे.
येणार्या वर्षात तंत्रज्ञानकेंद्रीत विकासावर भर दिला जाणार असून सर्व वर्ग हे डिजिटल करण्यावर भर देण्यात येणार असून एखादी परदेशी भाषाही विद्यार्थ्यांना शिकविली जाणार आहे. कारण, या संस्थेला आशा आहे की, इथे जसे हुशार आणि धडपडणारे विद्यार्थी घडले, तसे काही उद्योजकही घडतील. या संस्थेच्या कार्याचा प्रारंभ डोंबिवली पूर्व भागातील गोपाळनगर येथे झाला. सुमारे पहिल्या ३० वर्षांत संस्थेने शहराच्या चारही कोपर्यात व कसारा गावाजवळ वनवासी क्षेत्रात आश्रमशाळेच्या रूपाने भक्कमपाय रोवून आपला संसार विस्तारला. आज संस्थेच्या ७ माध्यमिक शाळा, ६ प्राथमिक शाळा, एक रात्र महाविद्यालय, एक इंग्रजी माध्यमिक शाळा कार्यरत आहे. प्रारंभीच्या काळात संस्थेच्या आर्थिक अडचणीत सुशिक्षित महिलांनी अत्यल्प वेतनावर अध्यापनाचे कामकेले. आज संस्थेचे जे रूप दिसत आहे, ते या काळात सर्व प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन उभे राहणार्या अण्णा नाबर यांच्या परिश्रमाचे फळ आहे. गेली अनेक वर्षे या शाळेतील मुले गुणवत्ता यादीत अव्वल येतात. १९६८ साली केवळ चार विद्यार्थीसंख्येवर ही शाळा सुरू झाली.
कै. मोकाशी यांनी स्वतःच्या घरात विद्यालय सुरू केले, त्यावेळचे त्यांचे सहकारी मुन्शी हे अध्यक्ष होते. राष्ट्रीय शिक्षण संस्थेने १९९३ साली २५ वर्षे पूर्ण केली. १९९३-९४ साली रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले. यावेळेस प्राचार्य डॉ. रामजोशी यांनी माणूस घडविण्याचे कामहे विद्यालय करत असल्याचे प्रशंसोद्गार काढले होते. रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम, प्रश्नमंजुषा स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, शिक्षण प्रशिक्षण परिसंवाद, शिक्षणसाधने निर्मिती प्रदर्शन भरविण्यात आले होते. प्रा. रामशेवाळकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रमुख पाहुणे म्हणून पुणे विद्यापीठाचे डॉ. श्रीपती शास्त्री उपस्थित होते.
१९९५ साली माध्यमिक शालांत परीक्षेत अपर्णा गोळे हिने प्रथमक्रमांक मिळवला होता. यानंतर हे सत्र कायमच सुरू राहिले. इतर स्पर्धा परीक्षेतही शाळेचा निकाल ९५ ते १०० टक्के लागतो. संस्थेच्या माजी विद्यार्थी संघाचे बहुमोल कार्य म्हणून रक्तदान शिबीर, व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते. महाराष्ट्र प्रज्ञा शोध व राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेसाठी संस्थेने विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन केंद्र संस्थेच्या राणा प्रताप शाळेत सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या मनावर राष्ट्रीय दृष्टिकोन व जीवनमूल्यांचे सतत संस्कार करणारे व विद्यार्थ्यांना सामर्थ्य संपन्न आणि गुणवंत राष्ट्रघटक बनविण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून ही शाळा गेली ५० वर्षे कामकरीत आहे. तसेच स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त विवेकानंद पुरस्काराचे वितरणही संस्थेच्या वतीने केले जाते. साहित्य, शास्त्र, कला-विज्ञान, सामाजिक क्षेत्रातील नामवंत व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. आतापर्यंत प्राचार्य रामशेवाळकर, थोर समाजसेवक व राज्यसभा सदस्य नानाजी देशमुख, जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ जयंत नारळीकर, राष्ट्र सेविका समितीच्या माजी संचालिका उषाताई चाटी, थोर शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर अशा अनेक नामवंत व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
महा एमटीबी 11-Apr-2018